तंजावर संमेलनात बेळगावच्या कवींना निमंत्रण

तंजावरच्या साहित्य संमेलनात ‘बेळगावचा झेंडा’!

सीमाभागातील कवींना मानाचे निमंत्रण; ३० साहित्यप्रेमींचा चमू २१ रोजी तंजावरकडे रवाना होणार

 

बेळगाव (प्रतिनिधी) :सरफोजीराजांच्या मराठीप्रेमाने पावन झालेल्या तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्याचा स्वर घुमणार आहे. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात सीमाभागातील मान्यवर व कवींना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि निमंत्रक श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साहित्यिक सोहळा होणार आहे.

 

यावेळी कविसंमेलनात बेळगावचे शिवसंत संजय मोरे, खानापूरचे व्यं. कृ. पाटील आणि चंदगडचे रामदास बिर्जे आपल्या काव्यरचना सादर करणार आहेत. त्यामुळे बेळगाव, खानापूर आणि चंदगडच्या काव्यप्रतिभेची मांदियाळी तंजावरच्या रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

 

 

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अ.भा.म.सा. परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील तसेच मराठा मंदिरचे अध्यक्ष व उद्योजक आप्पासाहेब गुरव विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रंथदिंडीच्या शुभारंभप्रसंगीही त्यांची उपस्थिती राहणार असून, बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

तंजावरचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांचा बेळगाव सीमाबांधवांच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष तथा उद्योजक महादेव चौगुले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

संमेलनातील विविध विचारपीठांवर सीमाकवी रवींद्र पाटील सहभागी होऊन सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या वाटचालीवर विचार मांडणार आहेत.

या संमेलनासाठी बेळगावहून सुमारे ३० साहित्यप्रेमींचा चमू सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी तंजावरकडे कूच करणार आहे. त्यामुळे तंजावरच्या साहित्यपीठावर बेळगावच्या साहित्यप्रेमींचीही दमदार उपस्थिती राहणार आहे.

सरफोजीराजांची मराठी परंपरा आणि सीमाभागातून मायमराठीसाठी सुरू असलेली साहित्यिक वाटचाल यांचा संगम तंजावरच्या भूमीत घडणार असून, या निमित्ताने बेळगावच्या साहित्यविश्वाचा ठसा तंजावरच्या व्यासपीठावर उमटणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *