कुद्रेमानी, दि. २७ सप्टेंबर २०२६ :पावसाने दडी मारल्याने कुद्रेमानी परिसरातील पिके वाळण्याची स्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांसाठी पाण्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वरुणराजाची कृपा होऊन पुन्हा पाऊस पडावा, कुद्रेमानीची भूमी पाण्याने चिंब व्हावी आणि शेतकऱ्यांची पिके बहरावीत, या श्रद्धेतून कुद्रेमानी येथे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी *भूवाच्या पावलां* ची पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा करण्यात आली. 

कुद्रेमानी येथील मानीच्या कावलात कुद्रेमानी , तडशिनहाळ व तुर्केवाडी सिमेवर ‘भूवाची पावले’ आहेत. पावसाने काही दिवस दडी मारल्यास गावकरी एकत्र येऊन या पावलांची पूजा-अर्चा करतात. त्यानुसार आज गावातून वाजतगाजत फेरी काढण्यात आली. मानकरी गावडा यांच्या नेतृत्वाखाली ‘भूवाच्या पावलां’जवळ गऱ्हाणे घालून दूध, दही, तूप व पाण्याने अभिषेक करण्यात आला.

यानंतर भूवाच्या पावलांवर शेणाची थाप देण्यात आली. वरुणराजाची कृपा होऊन पाऊस पडावा आणि या पावलांवर थापलेले शेण पावसाच्या पाण्याने धुऊन जावे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या परंपरेमागे पाऊस पुन्हा सुरू व्हावा, कुद्रेमानीची भूमी थंड व्हावी, विहिरी-जलस्रोतांना पाणी मिळावे आणि हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाऊ नयेत, अशी शेतकरी बांधवांची मनोभावे प्रार्थना आहे.

पावसाअभावी शेतीवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी या पारंपरिक विधीत सहभागी होत बळीराजासाठी चांगला पाऊस पडावा, पिकांना जीवदान मिळावे आणि गावातील जनजीवन सुखी-समृद्ध व्हावे, अशी सामूहिक भावना व्यक्त केली